
वाई नगरपालिका शिक्षण मंडळ कार्यक्षेत्रात प्राथमिक शाळेतील गेली ३४ वर्षांचा माझा कार्यकाल एक सेवाव्रत शिक्षक म्हणून अतिशय आव्हानात्मक ठरणारा होता. चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीत न अडकता स्वतःचे वेगळेपण निर्माण करण्याचा ध्यास नसानसांत भिनला होता. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण यालाच प्रमाण मानून सकाळी आठ पासून जादा तासापासूनच माझी दिनचर्या सुरू होत असे. या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडले. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा, राज्य गुणवत्ताधारक झाले. त्यातीलच काही नोकरीनिमित्त महाराष्ट्र आणि देशातील मोठ्या शहरांमध्ये तसेच परदेशांतही कार्यरत आहेत. विविध क्षेत्रांतील त्यांची भरारी पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले आहे.
नगरपालिकेच्या शाळेत शिकून विकास बांडे, शीतल बुलुंगे, नवल जाधव, साक्षी पवार, श्रावणी संकपाळ यांसारखे विद्यार्थी डाॅक्टर म्हणून समाजसेवेसाठी तयार झालेले पाहताना ऊर अभिमानाने भरून येतो. चांदणी जमदाडे हिने पी. एच. डी. (डाॅक्टरेट) पदवी मिळवून आज ती वाय.सी.काॅलेज, सातारा येथे प्राणीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.
घड्याळाच्या काट्याप्रमाणे आयुष्य पुढे पुढे जात होते. आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासायला मोकळा वेळ असा मिळालाच नव्हता. सेवानिवृत्तीनंतरचा हा उत्तरार्ध सत्कारणी लागावा यासाठी लेखनासारखा उत्तम सहचारी मला मिळावा हा माझ्यासाठी दुर्मिळ योगायोग जुळून आला..! समृद्ध वाचन संस्कार व्यक्तीला मोठं करतो. वक्तृत्व आणि निबंध लेखनासाठीच्या विविध विषयांच्या तयारीसाठी वाचन आणि लेखनाची मर्यादित आवड मला जोपासता आली. सेवानिवृत्तीनंतर पुढे काय..? बऱ्याच लोकांना पडणाऱ्या या गहन प्रश्नाचे अचूक उत्तर मला मिळाले होते. आपण काहीतरी..जमेल तसे.. आणि जमेल ते लिहायचे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन लेखनास सुरुवात केली. त्यातील निवडक ५०० विचारांचे “विकास विचार कुंभ” हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा झालेला आनंद शब्दांच्या पलीकडला आणि अविस्मरणीय ठरला..!
विचारांचे लेखन सुरू असतानाच कविता लेखन करण्याचा प्रयत्न सुरू झाला. सुरुवातीलाच आपण ७५ कविता लिहायच्या असा निर्धार मनाशी पक्का केला. चार- पाच कविता लिहिल्यानंतर लेखणी बंद केली. प्रत्येक कवितेसाठी वेगळा विषय, आवश्यक मोठे शब्द भांडार कुठून आणायचे..? हे आपले काम नव्हेच. कविता लेखनाची नसती उठाठेव करण्याचा प्रयत्न आपण का करावा..? हा विचार मनाला स्पर्श करून गेला. माझी पत्नी सौ. नीलम हिने मला प्रोत्साहनाचे बळ दिल्यानेच पुन्हा लेखनास सुरुवात केली आणि “बोल भावनांचे” या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. तेही माझे बालमित्र महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. मकरंदआबा पाटील यांच्या शुभहस्ते…! आंधळा मागतो एक डोळा नी देव देतो दोन. हे माझ्यासोबत तंतोतंत लागू पडले. एकाच वेळी दोन पुस्तकांचे प्रकाशन व्हावे हेच मुळी स्वप्नवत वाटते आहे. आनंदाश्रू अनमोल का असतात? याचा स्वानुभव रोमांचित करणारा होता.
सामान्य गरीब कुटुंबातील अशिक्षित आई सुलोचना आणि थोडेफार शिक्षण झालेले वडील तुकाराम यांचा उनाड, व्रात्य ,खोडकर मुलगा विकास ही बालपणीची माझी मोठी ख्याती..आज वयाची एकसष्ठी पूर्ण होताना किती बदलली होती. “विकास विचार कुंभ” आणि “बोल भावनांचे” या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाने लोखंडाचेही सोने झाले आहे हे लिहितानाही डोळ्यांत आसवांनी दाटी केली आहे..!
आपला गाव, इथली माती, नाती आणि संस्कार, संस्कृती, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा, भौगोलिक रचना, सण समारंभातील वेगळेपण यांच्याशी आपले भावनिक नाते जोडलेले असते. आपल्या भावना जोडलेल्या असतात. त्या शब्दांत उतरवताना कधी मन भावनिक होते तर कधी व्यथितही होते. आठवणी हा आपल्या मनाच्या कप्प्यातील सुरक्षित अनमोल ठेवा असतो. त्याविषयी लिहिताना भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा साक्षात समोर उभा राहतो. याचा लेखन अनुभव कवितेत उतरवताना प्रत्यक्ष पुन्हा पुन्हा जगणं आणि आपल्या जीवनाशी त्याचा सहसंबंध अधोरेखित करतो..!
माझा लेखन प्रवास याच विचारांतून सुरू होऊन भावनांची आपोआप जोडला गेला आहे. आपला परिवार, आपले कुटुंबीय, मित्र नातेवाईक यांचा सहवास त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू, गुणवैशिष्ट्ये ठळकपणे अधोरेखित करण्याचे लेखनासारखे उत्कृष्ट माध्यम नाही. त्याविषयी लिहिताना अव्यक्त विचार बोलता येत नसले तरी लिहिता मात्र येतात. अगदी साध्या पोस्ट कार्ड पासून ते बंद लिफाफा यांतील दोन तीन कोऱ्या कागदामध्ये उतरलेले शब्द अंतर्मनाचा ठाव घेतात. हा अनुभव माझ्या पाठीशी होता. साध्या चारोळ्या ते कवितेतील शब्दमाला कित्येकांना आपलेसे करतात. यासाठी आता थांबायचे नाही. लेखनाची ही उर्मी मला स्वस्थ बसूच देणार नाही.
श्री. विकास तुकाराम घोणे,
सेवानिवृत्त शिक्षक,
नगरपालिका शिक्षण मंडळ,
वाई जि. सातारा
संपर्क क्र. 7972809410 / 9765784663




