वाई : किसन वीर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे ज्येष्ठ व अभ्यासू प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा सेवागौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थी आणि अध्यापक अशा दोन्ही भूमिकेत तब्बल ३८ वर्षे किसन वीर महाविद्यालयाशी जोडलेल्या डॉ. जाधव यांच्या ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील होते.
अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले, “डॉ. अर्जुन जाधव यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी न करता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केला. भौतिकशास्त्रासारख्या अवघड विषयात त्यांनी निर्माण केलेली अभ्यासू व गुणवंत अध्यापक म्हणूनची ओळख निश्चितच कौतुकास्पद आहे. ३८ वर्षांची त्यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थी घडले,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. निवृत्तीनंतरही डॉ. जाधव यांनी आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा समाजाच्या हितासाठी उपयोग करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. जाधव यांनी भौतिकशास्त्र विषयातील पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक मिळविले. हे पदक मिळविणारे किसन वीर महाविद्यालयातील ते पहिले विद्यार्थी होते. बाहेरील अनेक संधी उपलब्ध असतानाही आपल्या भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने त्यांनी किसन वीर महाविद्यालयात अध्यापनाची सेवा स्वीकारली. कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असतानाच जिद्द व चिकाटीने त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांचे संशोधनही भौतिकशास्त्र विषयाशी संबंधित असून विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे होते.
यावेळी डॉ. आकांक्षा जाधव, प्रा. राजश्री जाधव, प्रा. माधवराव गुरव, PSI राजेंद्र यादव, विठ्ठल शिंदे, राजेंद्र भोसले, प्रा. मोहन भोसले यांनी मनोगते व्यक्त करून डॉ. जाधव यांच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रा. गणेश चव्हाण यांनी डॉ. जाधव यांच्या शांत, संयमी व निर्मळ स्वभावाचा तसेच अभ्यासू व आदर्श शिक्षक म्हणून असलेल्या लौकिकाचा गौरव केला. प्रा. गणेश कोरे यांनी डॉ. जाधव हे विश्वासू मित्र व सहकारी असल्याचे सांगत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक केले.
यावेळी मा. मिलिंददादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, वृषालीताई चव्हाण, महादेव मस्कर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे, खटावकर सर यांच्यासह बोपेगाव, नांदवळ, सिद्धनाथवाडी व उत्कर्षनगर येथील ग्रामस्थ, किसन वीर महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, सहकारी, विद्यार्थी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले. प्रा. गणेश चव्हाण यांनी आभार मानले.





