वाई : इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात नुकताच संपन्न झाला. दंतचिकित्सा क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ दंतवैद्य तसेच विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कॉस्मेटिक डेंटिस्ट डॉ. राजेंद्र सोपे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून रोटेरियन स्वाती हेरकळ, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 उपस्थित होत्या. IDA वाई-पाचगणी शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पराग लांबाडे, नवनिर्वाचित सचिव डॉ. अमर कित्तूरकर आणि शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन झगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर IDA वाई-पाचगणी शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदस्थापना सोहळा पार पडला. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पराग लांबाडे व सचिव डॉ. अमर कित्तूरकर यांनी शाखेच्या आगामी कार्यकाळात दंतचिकित्सकांच्या हितासाठी तसेच समाजामध्ये दंतआरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे IDA Satara Branch मधील ज्येष्ठ व अनुभवी दंतवैद्यांचा सन्मान. IDA वाई-पाचगणी शाखेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दंतचिकित्सा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ दंतवैद्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वांचे प्रेरणास्थान असलेले ज्येष्ठ दंतवैद्य डॉ. प्रकाश चौकवले, डॉ. श्रीराम परांजपे, डॉ. प्रमोद कोदे, डॉ. आर. बी. देशपांडे, डॉ. विजयकुमार श्रीवास्तव, डॉ. अशोक वोरा आणि डॉ. विश्वास पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ दंतवैद्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि दंतचिकित्सा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करताना, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीतील दंतचिकित्सकांना प्रेरणा मिळते, असे मान्यवरांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी IDA वाई-पाचगणी शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. शाखेच्या माध्यमातून दंतचिकित्सकांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम तसेच सर्वसामान्यांमध्ये दंतआरोग्याबाबत जनजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमास दंतचिकित्सक, विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IDA वाई-पाचगणी शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.





