वाई : जनता शिक्षण संस्था, वाई संचलित किसन वीर महाविद्यालयात आदरणीय प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ खंड १ गौरवग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वा. महाविद्यालयाच्या A1A सभागृहात संपन्न होणार आहे.
या गौरवग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे माजी विधानपरिषद सदस्य मा. श्री. उल्हासदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, संपादक व लेखक मा. श्री. विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या उत्तुंग जीवनकार्यावर आणि योगदानावर प्रकाश टाकणारा ‘आधारवड’ (खंड-१) हा गौरवग्रंथ तयार करण्यात आला आहे. या गौरवग्रंथाचे संपादन प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे आणि प्रा. (डॉ.) शिवाजी कांबळे यांनी केले आहे.
या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळ्यास शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक, माजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गौरवग्रंथ समिती व जनता शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.




