वाई : गेले काही वर्षात जगभरात सर्वच क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अनेक गुंतागुंतीची कामे एआय द्वारे सहजगत्या होत असली तरी मानवी मनाचे संपूर्ण आकलन कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकलेली नाही. भावना, विचार आणि त्यानुसार वर्तन याचा कृत्रिम बुद्धीमध्ये अंतर्भाव नसतो. त्यामुळे अनेक संशोधनाअंती मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यात साम्य नसल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र बदलत्या काळाचे आव्हान स्वीकारत प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाची उपयुक्तता जाणून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ व एमकेसीलचे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमातील विशेष व्याख्यानाचे तिसरे पुष्प गुंफताना ते “मी आणि एआय” या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, संचालक सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, एमकेसीलचे वरिष्ठ व्यवस्थापक विकास देसाई, डॉ.विनायक भोसले तसेच संस्थेचे इतर सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
विवेक सावंत म्हणाले, अमेरिकेच्या निर्बंधांनंतर भारताने सुपर संगणक तयार केला. बाहेरचे तंत्रज्ञान न वापरता आपल्या देशाने भाषांतराबाबत स्वतःचे तंत्रज्ञान वापरले आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्येही एआयचा वापर होत आहे. एआय हे स्वतः सतत शिकत राहाते स्वतःमध्ये दुरुस्त्या आणि सुधारणा करत राहाते. माणूस त्याला शिकत राहण्यासाठी लागणारी कुमक आणि आज्ञावली देत राहातो. जुना एआय हा नियम आणि आज्ञा पाळणारा नोकर होता, पण नवा एआय हा सखोल शिकत राहणारा विद्यार्थी बनला; आणि निर्णयही घेऊ लागला आहे. त्यामुळे जे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते त्या ठिकाणी माणसाची गरज भासणार नाही. एआय हा निर्मितीक्षम आहे, तर माणूस हा नवनिर्मितीक्षम आहे. पुढील काळात भावनिक बुद्धिमत्तेला महत्त्व येणार आहे. त्यामुळे आपण एआय वापरणारे होण्यापेक्षा; एआयला कुमक पोहोचवणारे व्हायला हवे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थाध्यक्ष मदनदादा भोसले म्हणाले, पारंपरिक आणि प्रचलित शिक्षणपद्धती यांना मागे टाकत नवतंत्रज्ञान आणि एआयाचे आगमन झाले आहे. तरीही शिक्षण आणि रोजगाराची सांगड घालणे कमालीचे दुरापास्त झाले आहे. अशावेळी विवेक सावंत यांच्यासारखी तज्ज्ञ व्यक्तीच याच्यातून मार्ग काढेल असे मला मनोमन वाटते.
यावेळी विवेक सावंत यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे जेष्ठ संचालक केशवराव पाडळे आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांची पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद वीर यांनी आभार मानले. रेश्माबानो मुलानी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास आजी-माजी प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
श्री 420 या चित्रपटातील “प्यार हुआ इकरार हुआ” या गाण्यासाठी संगीत दिग्दर्शक शंकर जयकिशन यांनी तब्बल दीडशे वाद्ये वापरली होती. मन्ना डे आणि लता दीदी यांनी गायलेल्या या गाण्याचा एकत्रित असलेला म्युझिक ट्रॅक एआय द्वारे वेगवेगळा करण्याचे प्रात्यक्षिक सावंत यांनी करून दाखवले.






