वाई : अन्न आणि औषध प्रशासन कायद्याची २०११ पासून अंमलबजावणी सुरू असून किराणा भुसार मालाचे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, हातगाडी व्यावसायिक, मिठाई व्यावसायिक तसेच दूध व्यावसायिक, रेशनिंग व पोषण आहार पुरवठादार या सर्वांना या कायद्याच्या अधीन राहून व्यवसाय करणे बंधनकारक आहे. प्रत्येक व्यवसायाला परवाना आवश्यक आहे. याची नोंदणी आणि परवाना मिळवण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असते. सर्व लहान व मोठ्या व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे प्रतिपादन अन्न आणि सुरक्षा विभागाचे सातारा सहा. आयुक्त संजय शिंदे यांनी केले.
वाई व्यापारी महासंघ आणि अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या रमेश गरवारे सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी प्रियांका वाईकर, अल्पना गायकवाड, वाई व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत येवले, पदाधिकारी उमेश शहा, प्रताप खामकर, संतोष जमदाडे, राहुल जायगुडे, सागर मुळे, प्रसाद चरेगावकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. शिंदे पुढे म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून वाई व्यापारी महासंघाने या कार्यशाळेसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. व्यापारी आणि अन्न व औषध प्रशासन यांचा निकटचा संबंध असल्याने कार्यशाळेच्या माध्यमातून होणारा संवाद महत्त्वपूर्ण आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना नियमांची माहिती व्हावी या उद्देशाने कार्यशाळा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मागील काळात वाई येथे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची तपासणी केली असता दुधाचा दर्जा उत्तम असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी बोलताना अन्न सुरक्षा अधिकारी अल्पना गायकवाड यांनी व्यवसायाची नोंदणी, परवाना, स्वच्छता आणि सुरक्षित साठवणूक याविषयी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा व्यावसायिकांना घाबरवण्यासाठी नसून नियमांची माहिती व्हावी यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेचे व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट, पेस्ट कंट्रोल, पिण्याच्या पाण्याचे टेस्टिंग, आचारी आणि वेटर यांची नियमित वैद्यकीय तपासणी, स्टोअर रूमची स्वच्छता आदींबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रियांका वाईकर यांनी आपल्या मनोगतात हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना, परवान्याची अथवा नोंदणीची प्रत दर्शनी भागात लावणे, बिलावर नोंदणी अथवा परवाना क्रमांक छापणे,ग्राहकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, रेफ्रिजरेटर मध्ये व्हेज नॉनव्हेज पदार्थ वेगवेगळे ठेवणे, चोपिंग बोर्ड वेगवेगळे असणे, हॉटेल आचारी आणि कामगार यांची स्वच्छता, प्रशिक्षित फूड सेफ्टी सुपरवायझर, ग्राहक तक्रार नोंदवही आदिविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी व्यापाऱ्यांनी आणि इतर व्यावसायिक, नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
वाई व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत येवले यांनी प्रास्ताविक केले. सागर मुळे, यशवंत जमदाडे, अशोक लोखंडे, राहुल जायगुडे यांनी स्वागत केले. प्रीतम शहा यांनी सूत्रसंचालन तर प्रताप खामकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्यापारी बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.




