वाई, दि. १४ : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय मानसिक आरोग्य व्याख्यानमालेचे यंदा दहावे वर्ष आहे. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर ते सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सायंकाळी ६.३० वाजता कै. सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, वाई येथे ही व्याख्यानमाला होणार आहे.
व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्स प्रा. लि., पुणे येथील डॉ. भूषण केळकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर समुपदेशक डॉ. मधुरा केळकर या ‘मन ऐका, मन समजा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी केईएम हॉस्पिटल, पुणे येथील प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. वासुदेव परळीकर हे ‘ऐकणारे कान, समजून घेणारे मन’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी समुपदेशक डॉ. रुद्राक्षी करौशी या ‘ऐकण्यापासून कृतीपर्यंत’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता मानसिक ताण, नातेसंबंधांतील गुंतागुंत, संवादाचा अभाव आणि भावनिक समस्यांमुळे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक झाले आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या समजून घेणे, योग्य संवाद साधणे, भावनिक गरजा ओळखणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत घेणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन मिळावे, हा या व्याख्यानमालेचा प्रमुख उद्देश आहे.
गेल्या दहा वर्षांपासून मानसशास्त्र विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या व्याख्यानमालेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केली जात आहे. यंदाही नागरिकांना मानसिक आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या व्याख्यानमालेस नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद घोरपडे, प्रा. वीणा जाधव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.





